नवनाथ आव्हाड'

 



श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे.


वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे.


झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे,

तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे.


उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा,

पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा.


बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते,

उतरुनि येते अवनीवरती ग्राहगोलाची एकमते.


सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती,

सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती.


सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला,

पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला.


फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सावरती.

सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.


खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे,

मंजुळ पावा गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे.


देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना  हृदयात,

वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे श्रावण महिण्याचे गीत.


_____बालकवी


























 माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,

तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.


कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,

मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.


तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,

हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.


माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,

तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.


तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,

जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.


तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,

अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.


माय मराठी! तुझियासाठी वात होऊनी जळते मी,

क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.


                     _____संजीवनी मराठे                                                  

           (मराठी बालभारती - इयत्ता पाचवी)