माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी! तुझियासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
_____संजीवनी मराठे
(मराठी बालभारती - इयत्ता पाचवी)
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट,
ReplyDeleteमाझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ही कविता होती अमाच्या वेळी.